Posts

Showing posts from April, 2018

लाईट गेल्यावर...

पाऊस पडतोय वळवाचा. मग काय, लाईटपण गेलीये! (पुणेकर: तुमच्या 'शुद्ध ' भाषेत 'दिवे गेलेत.') आणि जाताना चांगला ' ढप्प-धम्म ' असा काहीतरी आवाजपण आलेला. म्हणजे लवकर परत यायचं लक्षण नाही. पण खरंतर खूप भारी वाटतंय माहितीए! मला अगदीच वेड्यात काढायच्या आधी त्याची कारणं ऐकून घ्या. अशी अचानक लाईट गेली ना, की  रातकिड्यांच्या आवाजाकडे लक्ष जायला लागतं. आजच्यासारखा पाऊस पडत असला तर मागच्या अंगणातली पन्हाळ्याच्या धारेची टपटप ऐकायला येते. टीव्ही बंद असतो ना, मग वारा  सुटल्यावर चंदनाची पानं  वेगळी सळसळ करतात आणि सिताफळाची वेगळी, हे पेटतं! मंद चंद्रप्रकाशात डोंगर-झाडांच्या आकृत्या लक्ष वेधून घेतात. संध्याकाळ निरभ्र असली तर आकाशातले तारे कधी नव्हे ते दिसायला लागतात, अगदी स्पष्ट! निरभ्र नसली, तर खराखरा संधिप्रकाश किती उशिरापर्यंत ढगांमध्ये खेळतो, याचं आश्चर्य वाटतं! आणि अंधार आणि शांतता असल्यामुळेच असले बघण्या-ऐकण्याचे साक्षात्कार होतात असं काही नाही! भास समजा पाहिजे तर, पण लाईट गेलेली असली तर आईच्या रोजच्याच फोडणीचा वास किती जास्त खमंग वाटतो म्हणून सांगू! पावसाळ्यातपण मात