लाईट गेल्यावर...

पाऊस पडतोय वळवाचा. मग काय, लाईटपण गेलीये! (पुणेकर: तुमच्या 'शुद्ध ' भाषेत 'दिवे गेलेत.') आणि जाताना चांगला ' ढप्प-धम्म ' असा काहीतरी आवाजपण आलेला. म्हणजे लवकर परत यायचं लक्षण नाही. पण खरंतर खूप भारी वाटतंय माहितीए! मला अगदीच वेड्यात काढायच्या आधी त्याची कारणं ऐकून घ्या.

अशी अचानक लाईट गेली ना, की  रातकिड्यांच्या आवाजाकडे लक्ष जायला लागतं. आजच्यासारखा पाऊस पडत असला तर मागच्या अंगणातली पन्हाळ्याच्या धारेची टपटप ऐकायला येते. टीव्ही बंद असतो ना, मग वारा  सुटल्यावर चंदनाची पानं  वेगळी सळसळ करतात आणि सिताफळाची वेगळी, हे पेटतं! मंद चंद्रप्रकाशात डोंगर-झाडांच्या आकृत्या लक्ष वेधून घेतात. संध्याकाळ निरभ्र असली तर आकाशातले तारे कधी नव्हे ते दिसायला लागतात, अगदी स्पष्ट! निरभ्र नसली, तर खराखरा संधिप्रकाश किती उशिरापर्यंत ढगांमध्ये खेळतो, याचं आश्चर्य वाटतं!

आणि अंधार आणि शांतता असल्यामुळेच असले बघण्या-ऐकण्याचे साक्षात्कार होतात असं काही नाही! भास समजा पाहिजे तर, पण लाईट गेलेली असली तर आईच्या रोजच्याच फोडणीचा वास किती जास्त खमंग वाटतो म्हणून सांगू! पावसाळ्यातपण मातीचा वास लाईट नसताना दसपटीने जास्त येतो. म्हणजे हे साधं लाईट जाणं पंचेंद्रियांची पातळीच उंचावर नेऊन ठेवतं! रोजचीच पोळी-भाजी या उंचावलेल्या संवेदनांच्या सोबतीत मस्त चव देऊन जाते.

लाईट असताना आपण एकतर टीव्हीवर कुठल्यातरी काल्पनिक कुटुंबाची काल्पनिक गाऱ्हाणी बघत बसतो, नाहीतर रिऍलिटी शोमधल्या खोट्या वास्तवाला भाळून आपल्याच आयुष्याची कीव करतो! म्हणजे एक पाय घरात आणि दुसरा शेकडो कोस लांब कुठेतरी, अशी गत असते. लाईट गेली, की आपल्याला किरकीर करत का होईना, दोन्ही पाय घरात आणावेच लागतात (मोबाईलची बॅटरी संपत अली असली तर अजूनच जास्त!) पंखा नसला की बाहेरच्या वाऱ्याकडे सगळं लक्ष लागतं. चंद्र बराच मोठा झालाय की, पौर्णिमा जवळ आली का होऊन गेली? असले काथ्याकूट होतात. शेजाऱ्यांचं बाळ मोठं झालं वाटतं, त्याची अगम्य बडबड चालूए! थोडावेळ का होईना, हे असं दोन्ही पाय एकाच जागी असणं मनाला खूप फ्रेश करून जातं हो! लाईट जाण्याबरोबर लहानपणीच्या खूप आठवणीही जोडलेल्या आहेत, पण त्या नंतर कधीतरी...

आता काढायचं तर काढा वेड्यात. मी आपली पावसानंतरच्या गार वाऱ्यात झोपून टाकावं म्हणते!

(May 18 2014, सातारा-रोड )

Comments

Popular posts from this blog

कडुलिंब

The Monster in My Head