कडुलिंब

 

दारी आईने लावले
एक निंबोणीचे झाड
रोमरोम त्याचे कडू
परी छाया थंडगार

बालपणीच्या स्वप्नाचे
केले पुन्हयांदा रोपण
दिनरात केले एक
त्याची करत राखण

दाट फांद्यांतून त्याच्या
पाखरांचे किती थवे
चिऊ, कोकिळा नि कधी
भारद्वजही विसावे  

गेले किती पावसाळे
वृक्ष गगना भिडला
त्याच्या सावलीशी टेके
आता सूर्यही ओशाळा!

झाडामागे निंबोणीच्या
झोपी चांदोमामा जाई
परी खिडकीच्या पाशी
रात-रात जागी आई

कडुलिंबी सावलीत
गार अंगण शोभते
झाडापाशी आता आई
फक्त घराला शोधते

Comments

  1. किती सहज आणि छान लिहितेस तू. मीच मला पाहिलं या कवितेत. अशीच लिहती रहा. व्यक्त होत रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog