लेखिकेचा ठोकळा (writer's block!)
ताज्या आल्याचा दरवळ चहाच्या वाफेवर उडत असतो. चहा परफेक्ट झाला की मातीचा वास का आठवतो? आणि सकाळी सकाळी अंगणात ऊन पडलं की गरम भाकरी आणि गवारीच्या फोडणीचा वास येतो! अरे वा! भारीच कनेक्शन आहे की हे! पण ताज्या डहाळ्याच्या वासाने नदीवरचा फेरफटका का आठवतो?
खोलात गेलं की असं होतं बघा. आता गावठी चाफा, कुंदा, घरगुती गुलकंद अशा वासांची मेडलीच होते डोक्यात! वासाची फुलं - रंगीत फुलं - गुलबक्षी, अबोली, कोरांटी - रांगोळीचे रंग - आकाशकंदील... सगळे वास आणि रंग मधली सुट्टी झाल्यासारखा मोकाट कल्ला करत सुटतात! कोपऱ्यात कुठेतरी काल रात्रीच्या दोन कोट्या स्वतःशीच खिदळत असतात, आणि साडेतीन यमकांचा 'ग्रुप' हातात हात धरून अजून अर्धं यमक शोधायला निघतो -
- एक मिनिट - हा आवाज कसला? वहीची पानं?!
क्षणार्धात डोक्यातल्या मजेदार कल्ल्याचा जाम गोंधळ उडतो.
रात्रभर हसत बसलेल्या कोट्यांचा स्वतःवरचाच विश्वास उडतो आणि खिदळणं एकदम बंद पडतं. यमकांचे हात सुटून ती एकेकटी गर्दीत हरवून जातात... आणि त्यांच्याबरोबर कधी पूर्णच न झालेली कवितापण. रंगांची आणि गंधांची हवेवरची नक्षी वावटळ आल्यासारखी उडून गायब होते, आणि उरल्या सुरल्या दीडदोन कल्पना भावविश्वाबाहेरच्या जगाला बुजून कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसतात. डोक्यातला भन्नाट कलकलाट जितका अचानक सुरू झाला, तितकीच अचानक चिडीचूप शांतता पसरते.
उरते ती कोऱ्या कागदाकडे टक लावून बसलेली मी.
आणि थंड झालेला चहा.
(Nov 12, 2017)
असे कितीतरी कोरे कागद आणि पार निवून गेलेल्या चहा कॉफीचे कप गेल्या १०-१२ वर्षात मी बघत बसलोय मलाच आठवत नाही... खूप छान लिहिला आहे लेख
ReplyDeleteमनापासून आभार!
ReplyDelete